अमळनेर: येथील मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवार, ६ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा ह.भ.प. श्री. अक्षय भोसले महाराज (पुणे) यांच्या शुभहस्ते विशेष रुद्राभिषेक महापूजा करण्यात आली.
प्रारंभी श्री. भोसले महाराज यांनी गणेशपूजन केले. त्यानंतर मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर रुद्राभिषेक करण्यात येऊन हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा पठण तसेच भाविकांकडून पुष्पवृष्टी होऊन पाळणा हलवत भक्तिमय व मंगलमय वातावरणात ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘संकटमोचन हनुमान की जय’, असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन रात्री उशिरापर्यंत भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मंगळग्रह मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना जयेंद्र वैद्य, अतुल दीक्षित, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी यांनी सहकार्य केले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, भद्राप्रतीक मॉलचे संचालक प्रताप साळी, सेवेकरी आशिष चौधरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी ६ वाजता मंगळग्रह मंदिरात संगीतमय सुंदरकांडचे देखील आयोजन करण्यात आले.