अमळनेर (जि. जळगाव महाराष्ट्र)- येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित मंगळग्रह मंदिरात दर मंगळवारी लाखोंच्या तर अन्य दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक अभिषेक व दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून येथील मंदिर व्यवस्थापन काळजी घेत असते.
महाराष्ट्रसह देशविदेशातील हजारोंच्या संख्येने भाविक येथे मुक्काम देखील करतात .या पार्श्वभूमीवर भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात मोबाईलसाठी चार्जिंग पॉइंट बसविण्यात आले आहे. जर मोबाईलची बॅटरी उतरली तर मोठीच गैरसोय होते.यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी येथील विश्वस्त मंडळाने मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे आता परिसरात कुठल्याही ठिकाणी भाविक बसल्यास त्यांना सहज मोबाईल चार्ज करणे सोयीचे झाले आहे. बऱ्याच वेळा दिवसभर प्रवास केल्यानंतर भाविक मंदिरात येत असल्याने अनेकांचे मोबाईल डिस्चार्ज झालेले असतात. मंदिर परिसरात देण्यात आलेल्या या सुविधेमुळे आता प्रत्येकाला मोबाईल चार्ज करणे शक्य झाले असून आप्तेष्टांशी संपर्क करणे सोयीस्कर झाले आहे. या सुविधांमुळे येथे येणाऱ्या भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.