उन्हाच्या दाहाकतेत गारव्याची अनुभूती – महाराष्ट्रातील एकमेव मंदीर
अमळनेर- यंदा फेब्रुवारी महिन्यातच मार्च, एप्रिल महिन्याच्या उकाळ्याची अनुभूती नागरिकांना येऊ लागले आहे. येणाऱ्या काही दिवसांत उन्हाची दाहकता वाढून अंगाची लाही-लाही होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा रणरणत्या उन्हात दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी खास फॉग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे.
भाविकांसाठी शुद्ध व सुगंधी जलबिंदूंचा वर्षाव करणारी ही यंत्रणा असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. यामुळे मंदिर परिसरात गारवा निर्माण होऊन भाविकांना भर उन्हात देखील दिलासा मिळतोय. या फॉग सिस्टीममुळे भाविकांचे अंग ओले होत नाही,मात्र त्यांना गारव्याची अनुभूती येते. मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या संकल्पनेतून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मंदिराच्या संपूर्ण परिसरात या फॉग सिस्टीमचा वापर करण्यात आल्याने भाविकांना उन्हाच्या दाहकतेपासून आराम मिळत आहे. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर हे मंगळ देवाची मूर्ती असलेले भारतातील एकमेव मंदिर आहे. हे मंदिर अतिप्राचीन आणि अतिजागृत देवस्थान असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दर मंगळवारी तर लाखोंच्या घरात भाविक अभिषेक आणि दर्शनासाठी येत असतात. उन्हाळ्यात तापमान अधिक असल्याने उन्हाच्या झळापासून बचाव व्हावा, भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात या फॉग सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,विश्वस्त हे नेहमी तत्पर असतात.