राज्यातील सर्वात रुबाबदार चौक्यांत होईल समावेश अशी आहे डिझाईन
पैलाड परिसरातील पोलीस चौकीचे नवनिर्माण मंगळग्रह सेवा संस्था करीत आहे. या कामाचे भूमिपूजन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या हस्ते झाले होते. पोलीस चौकीच्या पुनर्बांधणी स्लॅबचे नुकतेच पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, इंजिनियर संजय पाटील, कंत्राटदार साबीर शेख यांच्यासह मंदिराचे सेवेकरी उपस्थित होते.
ही चौकी शिवकालीन किल्ल्याच्या स्वरुपात तयार होते आहे. राज्यातील सर्वात रुबाबदार चौक्यांमध्ये या चौकीचा समावेश होईल , असे तीचे डिझाईन आहे.
अमळनेर हा जिल्ह्यातील मोठा तालुका आहे. यामुळे येथे व्यावसायिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. चोपडा व पारोळ्याकडे जाणारी रहदारी आणि श्री मंगळ ग्रह मंदिरामुळे वर्दळ ताडेपुरा, सिंधी कॉलनी, पैलाड परिसर हा मोठ्या वर्दळीचा भाग झाला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथे पोलीस चौकीचे अधिक महत्व आहे.या चौकीमुळे घात-अपघात व गुन्हेगारीलाही आळा बसतो .यामुळेच सामाजिक जाणीवेचे उचीत भान ठेऊन शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या देखण्या पोलीस चौकीचे नवनिर्माण मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे केले जात आहे.