अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपारिक पद्धतीने पर्यावरण पूरक होली पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम पाटील ( पानखिडकी ) पूजेचे मानकरी होते. होली पूजनापूर्वी त्यांनी मंदिरात श्री सत्यनारायणच्या महापूजेसह अन्य पूजाही केल्या. सुमारे अडीच तास एकूण पूजा विधी चालला. पूजेच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना तीर्थप्रसाद वाटण्यात आला.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम , सेवेकरी आर. जे. पाटील , राहुल पाटील तालुक्यातील अमोदे येथील सरपंच रजनी पाटील यांच्यासह सेवेकरी व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. होली पूजनानंतर श्री मंगळग्रह मंदिरात संतोष पाटील व ख्यातनाम ज्योतिष उदय पाठक यांनी सपत्नीक महाआरती केली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून होली पूजनाचा आनंद मनवला. मंदिराचे पुजारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी पौराहित्य केले.