श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पर्यावरण पूरक आगळे वेगळे आणि विविध उपक्रम राबविले जातात. मंगळग्रह सेवा समितीतर्फे यात गेल्या पंधरा वर्षापासून रोपांची नर्सरी सुरू आहे. येथे अनेक फुलझाडांची उत्तम रोपे मिळतात. याबरोबर शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेल्या मंगल गांडूळ खताचा समावेश आहे.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या संकल्पनेतून नर्सरी व मंगल गांडूळ खत निर्मिती सुरू आहे. मंदिर परिसरातील पालापाचोळा, फुले, गोमूत्र, निर्माल्य तसेच शेणाचे मिश्रण तयार करून पाणी मिश्रित गिलावा तयार केला जातो. यात कुठल्याही प्रकारची रासायनिक भेसळ केली जात नाही. खत तयार व्हायला तब्बल साठ दिवसांचा कालावधी लागतो.
गांडूळ खत बनविण्यासाठी मंदिर परिसराच्या जवळच प्लास्टिक बेड मध्ये फुल, निर्माल्य, गोमूत्र आदी घटकांचे मिश्रण टाकण्यात येते. त्यात गांडूळ सोडण्यात येतात. त्यातील गिलावा कायम ठेऊन कोणतीही भेसळ न करता अति शुद्ध पद्धतीने खताची निर्मिती केली जाते. याचप्रमाणे संस्थांकडे असलेल्या गीर गाईंच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या पूजा होम हवनासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहे. याला मोठ्या प्रमाणावर धार्मिक महत्त्व आहे.